Sunday, May 10, 2015

सिबिल स्कोर कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळविण्या करीता महत्वाचा झाला आहे. तुम्हाला माहिती आहे का CIBIL Score म्हणजे नक्की काय तेसिबिल स्कोअर ग्राहकांना ४५० रुपयांच्या मोबदल्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या स्कोअरच्या आधारावरच सगळ्या बॅंका किंवा वित्तसंस्था ग्राहकांना कर्ज देतात, हे तर सगळ्यांना माहिती आहे. तरीही हा स्कोअर जाणून घेण्यासाठी ४५० रुपये देणे योग्य आहे का, हे समजून घ्यावे लागेल.
क्रेडिट इन्फोर्मेशन ब्यूरो ऑफ इंडिया लिमिटेड ही ग्राहकांच्या क्रेडिटसंदर्भातील माहिती देणारी एक कंपनी आहे. बॅंका आणि अन्य वित्तसंस्थाकडून कर्ज घेणाऱया ग्राहकांची माहिती सिबिल आपल्याकडे जमा करते. ग्राहकांनी घेतलेले कर्ज आणि त्याची परतफेड या सगळ्याची माहिती सिबिल आपल्याकडे जमवते. तुम्ही गेल्या ३-४ वर्षांत कोणतेही कर्ज घेतलेले असले किंवा तुम्ही कोणतेही क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुमच्या कर्जाबद्दलची सगळी माहिती सिबिलकडे असते. तुम्ही घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळच्यावेळी आणि योग्य पद्धतीने केलेली असेल, तर सिबिलकडे त्याबाबतची सगळी माहिती असते. तुम्ही आणखी कर्जासाठी किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला असेल, तर सिबिलकडे तुमचे रेकॉर्ड चांगले असल्यास तुम्हाला सहजपणे नव्याने कर्ज मिळू शकते.
सिबिलकडून आता कर्जाच्या परतफेडीच्या अहवालाबरोबरच तुमचे स्कोअरकार्डही मागू शकता. या स्कोअरकार्डमध्ये ३०० ते ९०० अंकांमध्ये तुमचा स्कोअर देण्यात आलेला असतो. या स्कोअरकार्डच्या साह्याने तुम्ही कर्जाची परतफेड करण्याची शक्यता कितपत आहे, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
जर तुमचा स्कोअर ९०० असेल, तर तुम्ही कर्जाचे हप्ते चुकविण्याची शक्यता अजिबात नाही, हे कर्जदात्यांना ठरविता येऊ शकते. याच्या अगदी उलटे म्हणजे जर तुमचा स्कोअर ३०० असेल, तर तुम्ही कर्जाचे हप्ते चुकविण्याची शक्यता अधिक असल्याचे स्पष्ट होते. एका विशिष्ट पद्धतीने हा स्कोअर काढला जातो. त्यामुळे समान उत्पन्न असूनही तुमचा स्कोअर कमी आणि तुमच्या एखाद्या मित्राचा स्कोअर जास्त का, याची माहिती तुम्हाला मिळू शकत नाही. कोणत्या कारणांमुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी झालाय, याची माहिती तुम्हाला मिळू शकते. उदा. तुम्ही जर क्रेडिट कार्डचे पैसे वेळच्यावेळी भरले नसतील, तर तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो.
सिबिल स्कोअर आणि त्याचा अर्थ
६०० आणि त्यापेक्षा कमी स्कोअर चांगला मानण्यात येत नाही. या स्कोअरच्या आधारावर कोणीही तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार नाही.
६०० ते ७०० स्कोअर असेल, तर तुमच्या आर्थिक व्यवहारांबद्दल अतिरिक्त माहिती मिळाल्यावरच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते.
७०० ते ७५० च्या दरम्यान स्कोअर असेल तर सहजपणे तु्म्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते.
७५१ ते ८०० स्कोअर चांगला मानण्यात येतो, यामध्ये अधिक सहजपणे तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळते.
८०० आणि त्यापेक्षा अधिक स्कोअर अतिशय योग्य मानण्यात येतो. तुम्हाला सहजपणे क्रेडिट कार्ड किंवा कर्ज मिळू शकते.
(हर्ष रुंगठा - लेखक अपनापैसा डॉट कॉमचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत.)

No comments:

Post a Comment